आधुनिक भारताचा इतिहास – मिठाचा सत्याग्रह


कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी तडजोडीच्या मार्गाचा अवलंब करून पाहिला . त्यांनी ‘ यंग इंडिया’मध्ये लेख लिहून आपल्या मागण्या व्हाईसरॉय यांच्यापुढे मांडल्या आणि या मागण्या सरकारने मान्य केल्यास कायदेभंगाची चळवळ होणार नाही असे जाहीर केले . गांधीजींनी मांडलेल्या अकरा मुद्यांत मिठावरील कर संपूर्ण रद्द करावा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता . तथापि व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी त्या मागण्यांना कसलाच प्रतिसाद दिला नाही . महात्मा गांधी त्या वेळी साबरमती आश्रमात राहत असत . त्यांनी आगामी लढ्याच्या स्वरूपाविषयी दीर्घ चिंतन करून मिठावर कर बसवणाऱ्या कायद्याचा भंग करून सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे शिंग फुंकण्याचे ठरवले .

मिठाच्या सत्याग्रहाचा निर्णय महात्मा गांधींनी जाहीर केल्यावर सुरुवातीस त्यांचे काही सहकारीही चक्रावून गेले .

देशातील अनेक विचारवंतांना हा मार्ग विश्वासार्ह वाटला नाही त्यांनी मिठाच्या संकल्पित सत्याग्रहाची टवाळीसुद्धा आणि म्हणून केली . तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनीसुद्धा या सत्याग्रह चळवळीची गंभीर दखल घेतली नाही . चिमूटभर मिठाच्या साह्याने ब्रिटिश साम्राज्याला धक्का देण्याची गांधीजींची कल्पना त्यांना हास्यास्पद वाटली . मूठभर मिठामुळे साम्राज्याचा पायाच हादरेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते . दांडी यात्रा : महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाची आपली योजना जाहीर केली . त्यानुसार ते १२ मार्च १ ९ ३० रोजी अठ्यात्तर सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून निघून दांडी येथील समुद्र किनाऱ्यांपर्यंत सुमारे दोनशे एक्केचाळीस मैल चालत जाणार होते आणि तेथे मिठाचा कायदा मोडून सत्याग्रह करणार होते . सत्याग्रहाच्या या स्वरूपाने संपूर्ण देश हेलावून गेला . दांडी यात्रेला शुभेच्छा व सत्याग्रहींना निरोप देण्यासाठी अहमदाबाद परिसरातील जवळजवळ पाऊण लाख लोक साबरमती आश्रमात जमले . जगातील विविध देशांचे पत्रकार दांडी यात्रेसाठी भारतात दाखल झाले . महात्मा गांधी व त्यांचे ७८ सहकारी पदयात्रा करत साबरमती आश्रमातून दांडीच्या दिशेने कूच करू लागले . वाटेत प्रत्येक खेड्यात लोकांनी उत्साहाने त्यांचे स्वागत केले . गांधीजींनी स्वागतासाठी जमलेल्या लोकांपुढे छोटीशी भाषणे केली . या भाषणांतून त्यांनी लोकांना निर्भय बनून कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले . दांडी यात्रेने संपूर्ण देशात एक नवचैतन्य निर्माण झाले . ६ एप्रिल १ ९ ३० रोजी महात्मा गांधी व त्यांचे सहकारी यांनी दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर मिठाचा सत्याग्रह करून कायदेभंगाची चळवळ सुरू केली . सरकारने कोणालाच अटक केली नाही . त्यानंतर गांधीजींनी पत्रक काढून ‘ लोकांनी मिठाचा कायदा मोडून सरकारचा आदेश पायदळी तुडवावा ‘ असे आवाहन केले . या आवाहनास प्रचंड प्रतिसाद मिळाला . हजारोंच्या संख्येने लोक ठिकठिकाणी जमले व त्यांनी मिठाचा कायदा तोडला . मिठाचा सत्याग्रह ही एक प्रतीकात्मक कृती होती . तरीसुद्धा ब्रिटिश सरकारने आपल्या साम्राज्याच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी ही चळवळ दडपून टाकायचे ठरवले . राष्ट्रीय सभेच्या अनेक नेत्यांना सरकारने अटक केली .

Leave a Comment