दादोबा पांडुरंग तर्खडकर – महाराष्ट्रातील समाज सुधारक
मराठी भाषेचे गाढे विद्वान, मराठी भाषेचे व्याकरण कार म्हणून परिचित असलेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म इस 9 मे 1814 रोजी मुंबईत झाला. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणीनी असे म्हणतात. ते धार्मिक वृत्तीचे होते शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थांच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना एल्फिन्स्टन संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. भील्लांच्या बंडाचा बीमोड त्यांनी कुशलतेने केला निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून त्यांनी काम केले. दादोबा पांडुरंग यांच्या कार्याची पोच म्हणून सरकारने त्यांना रावबहादुर पदवी बहाल केली.
दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील नव तरुणांत आधुनिक ज्ञानविज्ञानामुळे एक नवी दृष्टी निर्माण झाली होती, त्यामुळे आपल्या समाजातील दोष व उनिवा यांची जाणीव त्यांना होऊ लागली, या जाणिवेतूनच १८४४ मध्ये त्यांनी सुरत येथे दुर्गाराम मांच्छाराम, दीनमनी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने ‘मानवधर्म सभा’ स्थापन केली. ईश्वर एक आहे, मनुष्य मात्राची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेने वागावे इत्यादी उदात्त तत्त्वांचा पुरस्कार केला. परंतु कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ती संस्था फार काळ टिकू शकली नाही त्यानंतर भिकोबा चव्हाण राम बाळकृष्ण जयकर यांसारख्या मित्रांच्या मदतीने दादोबांनी मुंबई येथे १८४९ मध्ये परमहंस सभा स्थापन केली. यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली.पांडुरंग यांनी 1871 मध्ये सर जमशेदजी जीजीभॉय जरथोस्ती मदरसा येथे थोडक्यात संस्कृत शिकवले. 1848 मध्ये, त्यांनी उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा , विद्यार्थ्यांची साहित्यिक आणि वैज्ञानिक सोसायटी स्थापन केली आणि त्याचे अध्यक्षपद भूषवले. आधुनिक ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जातात. त्यांचा मृत्यू इसवी सन 17 ऑक्टोबर 1882 रोजी झाला.